Riteish Deshmukh : राजा शिवाजी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, उत्सुकता शिगेला; जिनिलियाने शेअर केली पोस्ट म्हणाली “जेव्हा अंधाराला…”
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
Riteish Deshmukh : १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते, जेव्हा देशाचा बराचसा भाग परकीय राजवटीखाली होता. त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला आणि रयतेचे राज्य निर्माण केले.
शिवजयंती निमित्त अभिनेता रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाही कारकीर्दीला चित्रभाषेचे स्वरुप दिले आहे. आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
राजा शिवाजी चित्रपटाच्या पहिल्या खास पोस्टरमध्ये रितेश रणांगणावर उभा आहे, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात भगवा ध्वज आहे. या लूकवरून स्पष्ट होते की हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठीच्या संघर्षाचे चित्रण करणार असणार आहे. रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा पाहणे मोठी पर्वणी असणार आहे. रितेशची पत्नी जिनिलिया देशमुख हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये, आज तोच दिवस आहे, जेव्हा अंधाराला पहिल्यांदा प्रकाशाचं स्वप्न पडलं.. जेव्हा इतिहासानं नव्या भविष्याकडे पाउल उचललं… जेव्हा आपल्या मातीला मिळाला नवा स्वाभिमान..शिवजयंतीच्या पावन निमित्ताने, Jio Studios आणि Mumbai Film Company सादर करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित राजा शिवाजी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर ! असे लिहिले आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजय-अतुल या प्रसिद्ध जोडीने संगीत दिले आहे. या चित्रपटात संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, फरदीन खान आणि भाग्यश्री या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. रितेशच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तो शेवटचा २०२५ मध्ये ‘हाऊसफुल ५’ आणि ‘मस्ती ४’ मध्ये दिसला होता. या वर्षी त्याचा ‘धमाल ‘ रिलीज होणार आहे. सध्या तो बिग बॉस मराठी सीझन ६ चे होस्टिंग करत आहे.
हेही वाचा : Donald Trump on Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच इराणला अल्टिमेटम ; म्हणाले,”१० दिवसांत अणु करार केला नाही तर..”




