“बुलेट ट्रेनला वेग..! पहिला टप्पा २०२७ मध्ये होणार सुरू, अश्विनी वैष्णवांची घोषणा”

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे ९ तासांचा प्रवास २ तासांवर येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होणार आहे. तसेच पुढच्या टप्प्यात म्हणजेच २०२८ मध्ये ठाणे आणि त्यानंतर २०२९ मध्ये मुंबईत बुलेट ट्रेन धावेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील शिळफाटा बोगद्याच्या ब्रेकथ्रू कार्यक्रम शनिवारी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पार पडला. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे घणसोली येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंत्री वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अश्विनी वैष्णव म्हणाले, मध्यमवर्गीयांसाठी बुलेट ट्रेन सेवा ही वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुगल अॅपवर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानचा प्रवास वेळ नऊ तास दाखवते. परंतु बुलेट ट्रेनमुळे हे अंतर दोन तास आणि सात मिनिटांत पूर्ण होईल. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरत-बिलिमोरा सेक्शनवर सुरू केला जाईल. त्यानंतर २०२८मध्ये ठाणे आणि २०२९ मध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली.
बुलेट ट्रेन सेवा अशा प्रकारे सुरू करण्यात येणार आहे की, सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत दर अर्ध्या तासाने एक ट्रेन निघेल. एकदा संपूर्ण नेटवर्क स्थिर झाल्यानंतर गर्दीच्या वेळेत ती दर १० मिनिटांनी एक बुलेट ट्रेन धावेल. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षणाची आवश्यकता राहणार नाही. यामुळे प्रवाशांना सुलभ आणि सुखकर प्रवास करता येईल, असे त्यांनी सांगितले.





