मुंबईकरांचा प्रवास होणार सुलभ; स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल लवकरच धावणार

Mumbai Local | मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलमध्ये आता बदल केला जाणार आहे. जून 2025 मध्ये मुंब्राजवळ दोन लोकल गाड्यांमधून प्रवासी खाली पडून दुर्दैवी अपघात झाला होता. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
आता नवीन वर्षापासून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावणार आहेत. मुंबईकरांना सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाची हमी देण्यासाठी मंत्रालयाने 238 नव्या एसी लोकल गाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील 4.8 किलोमीटर बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांची सुरक्षा ही आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे सध्या धावणाऱ्या जुन्या लोकल गाड्यांनाही ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टीम बसवली जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या जोडीने जुन्या गाड्यांचेही आधुनिकीकरण केले जाईल.’ Mumbai Local |
लोकल गाड्यांचे नूतनीकरण
रेल्वे मंत्र्यांनी असे नमूद केले की, ‘नव्याने बनणाऱ्या सर्व नॉन-एसी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित प्रणालीसाठी स्वतंत्र तरतूद केली आहे. पहिली अशा स्वरूपाची आधुनिक लोकल पुढील वर्षापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित आहे. सध्या फक्त एसी लोकलमध्येच ही सुविधा उपलब्ध आहे. लवकरच मुंबईच्या उपनगरी रेल्वेचे स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसेल.’ असेही वैष्णव यांनी अधोरेखित केले. Mumbai Local |
नॉन-एसी गाड्या नव्याने डिझाईन
- इंटिग्रल कोच फॅक्टरीला सर्व नॉन-एसी गाड्या नव्याने डिझाईन करण्याचे काम देण्यात आले आहे. यात स्वयंचलित दरवाजांसोबतच योग्य व्हेंटिलेशनचीही सोय करण्यात आली आहे.
- या संपूर्ण प्रकल्पासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने सुमारे 21 हजार कोटी रुपये किमतीचे 2856 पूर्णपणे वातानुकूलित वंदे मेट्रो कोच खरेदी करण्यासाठी आधीच जागतिक निविदा काढण्यात आलेली आहे.
- स्वयंचलित दरवाजे सुविधेसह गादीयुक्त सीट, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि १३० किमी प्रतितास वेग गाठण्याची क्षमता या सुविधांचाही समावेश असेल.
- नव्या लोकलमध्ये लुव्हर्ड पॅनेल्स आणि छतावर व्हेंटिलेशन युनिट्स बसवले जाणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेसही हवा खेळती राहून प्रवाशांना पुरेसा श्वास घेणे सुकर होईल.
- सामान्य लोकलचे डबे एकमेकांना जोडले जातील. त्यामुळे लोकलच्या एका डब्यामध्ये चढल्यास, दुसऱ्या डब्यामध्ये जाणे शक्य होईल. यामुळे गर्दी विभाजित करणे शक्य होईल.
या नवीन रचनेची पहिली लोकल नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होईल. तर, आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाईल. तसेच, मुंबई उपनगरी रेल्वे सेवांसाठी तयार करण्यात येणाऱ्या २३८ वातानुकूलित लोकलव्यतिरिक्त या लोकल असणार आहेत. आता स्वयंचलित दरवाजे आणि सुधारित सोयीमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आधुनिक आणि सुलभ होणार आहे.
हेही वाचा:
पडळकरांनी केलेली टीका जिवलग मित्रालाही खटकलीच! सदाभाऊ खोत म्हणाले…”आपली लढाई …”





