Bullet Train : बुलेट ट्रेन कधीपर्यंत धावणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

सुरत : भारतात पहिली हायस्पीड बुलेट ट्रेन केव्हा धावणार याची उत्सूकता सर्वांनाच आहे. याबद्दलीच मोठी अपडेट स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी बुलेट ट्रेनच्या सूरत स्टेशनला भेट दिली. यावेळी मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन केव्हा धावणार याबद्दल त्यांनी माहिती दिली. देशातील पहिल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे.
या प्रकल्पातील सूरत ते बिलीमोरा या गुजरातमधील 50 किलोमीटर भागात 2027 दरम्यान बुलेट ट्रेन सुरु होणार असल्याचे अश्विनी वैष्णव म्हणाले. 2029 पर्यंत बुलेट ट्रेनचा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यासाठी आता 2029 चा मुहूर्त सांगितला. मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी बुलेट ट्रेनने अवघे दोन तास सात मिनिट लागणार आहेत.
सूरत येथे बुलेट ट्रेन स्टेशनचे बांधकाम आणि ट्रॅक बसवण्याचे काम सुरु आहे. या कामांची अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी पाहणी केली. पहिल्या बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 2027 मध्ये सुरु होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 2028 पर्यंत ठाणे अहमदाबाद हा मार्ग सुरु करण्याच्या दृष्टीने वेगाने काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. अहमदाबाद ते मुंबई हा संपूर्ण प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होईल अशी शक्यता आहे.





