पिंपरी, (प्रतिनिधी) – अंधारातून प्रकाशाकडे..कधी काळी याच भागात अंधारात, दिव्याखाली मी अभ्यास केला, काकडी विकली आणि आता आमदार झाल्यांनतर माझा पहिला विकास निधी मला याच भागाला देता आला. जिथं मी घडलो, त्या भागातील विकासासाठी मला काम करता आले, हे मी माझे भाग्य समजतो. अशा भावना आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केल्या. ६० केव्हीचे २ ट्रान्सफार्मर आमदार गोरखे यांच्या आमदार निधीतून मोहननगर, काळभोरनगर भागाला देण्यात आले. ट्रान्सफार्मरच्या भूमिपूजन समारंभ ते बोलत होते. यावेळी आमदार गोरखे यांनी आपल्या शालेय व बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या पुढे आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचा विकास करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कैलास कुटे, गणेश लंगोटे, वैशाली काळभोर, विशाल काळभोर, मारुती भापकर, मनीषा शिंदे, दिलीप दातीर, दत्ता देवतरसे, विष्णू चावरिया, संजय जगताप, भास्कर पुणेकर, तुळशीराम काळभोर, मिनल यादव, रवि नामदे, राहुल बोरकर, राम दातीर, प्रशांत थरकुडे, संदीप बामने, प्रसाद हिरणवाळे, तुषार नामदे, कमलेश मुथा, नितिन चिलेकर, कमलेश लुंकड आदी उपस्थित होते.