Karjat News – हिंदू परंपरेनुसार, ‘सटवाई’ ही नवजात बालकाचे भविष्य व नशीब लिहिणारी देवता मानली जाते. बाळ जन्मल्यानंतर साधारणपणे पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तिचे पूजन केले जाते. कारण या दिवसापर्यंत बाळाचे नशीब कोरे असते व सटवाई येऊन त्याचे प्रारब्ध ठरवते अशी समजूत तथा आख्यायिका आहे. या देवीला अन्य नावानेही संबोधिले जाते. अशा या देवीचे मंदिर कर्जत नगरपरिषद येथील भिसेगाव येथे आहे. या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सटूआई नगर मधील महिला ग्रामस्थांनी केली असून तशा आशयाचे निवेदन आमदार महेंद्र थोरवे यांना सादर केले आहे. सद्यस्थितीत भिसेगाव येथील हे सटवाई आईचे मंदिर छोटे खाणी उघड्यावर वसलेले आहे. साहजिकच त्यामुळे मूर्तीवर ऊन पावसाचा मारा होऊन तसेच धूळ उडून दूरवस्था होत आहे. सटवाईची जेव्हा यात्रा असते तेव्हा भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे हे मंदिर नव्याने बांधणे तथा त्याचा जीर्णोद्धार करणे गरजेचे असल्याचे मत येथील सटूआई नगर मधील महिलांची मागणी आहे. मंदिर उभारणे गरजेचे आहे. यासाठी भिसेगावातील सटू आई विभागातील महिलांनी ज्योती कुळकर्णी यांच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन मंदिर बांधण्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे. आणि यासाठी 15 लाखाचा निधी देण्यात येईल असे आश्वासन आमदार थोरवे यांनी या गावातील महिलांना दिले आहे. निवेदन देताना ज्योती कुळकर्णी, रेणुका जाधव, अस्मिता घोडविंदे नंदा देशमुख , तारा दिसले, अशा घुटे, संगीता अन्सारी आदी महिला उपस्थित होत्या.