नागपूर: नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात भाजपने बहुमताकडे वाटचाल केली असतानाच, प्रभाग ३१ मधून एक अत्यंत प्रेरणादायी विजय समोर आला आहे. महानगरपालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा मुलगा, गणेश चर्लेवार, आता त्याच महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून पाऊल ठेवणार आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या गणेश यांनी रेशीमबाग प्रभागातून दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या या यशाने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नागपूर महापालिकेच्या १५१ जागांपैकी १०० हून अधिक जागांवर भाजपने आघाडी घेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत गणेश चर्लेवार यांची उमेदवारी विशेष चर्चेत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असलेल्या गणेश यांना भाजपने शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी दिली होती. त्यांचे वडील आजही महापालिकेत शिपाई म्हणून सेवा बजावत आहेत. ज्या कार्यालयात वडील सेवा देतात, तिथेच मुलगा आता धोरणकर्त्याच्या भूमिकेत दिसणार असल्याने भावनात्म वातावरण पाहायला मिळाले. विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी रेशीमबाग परिसरात गुलाल उधळत जल्लोष केला. “हा विजय माझ्या वडिलांच्या कष्टाचा आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा आहे,” अशी भावना गणेश चर्लेवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, नागपुरात काँग्रेस ३८ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आभा पांडे यांनी प्रभाग २१ मधून विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. मात्र, गणेश चर्लेवार यांचा विजय हा या निवडणुकीतील सर्वात ‘खास’ विजय ठरला आहे.