Lonavala : लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध ‘कातळधार’ धबधबा पर्यटकांसाठी प्रतिबंधित

लोणावळा – पर्यटक आणि ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला कातळधार धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला असून वनखात्याने त्यासंदर्भात आदेश पारित केले आहे.
लोणावळा शहराजवळील राजमाची किल्ल्याच्या मार्गावर असलेल्या कातळधार धबधब्याला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र या धबधब्याकडे जाणारी पायवाट निसरडी आणि प्रचंड धोकादायक झालेली असल्याने तसेच या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी सैल झाल्या असल्याने राजमाची ग्रामस्थांनी हा धबधबा पर्यटकांसाठी बंद करावा, अशी मागणी पोलीस आणि वन खात्याकडे केली होती.
त्याअनुषंगाने कातळधार धबधब्याकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असून तसे फलक वनखात्याकडून जागोजागी लावण्यात आले आहे. याशिवाय राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑफरोडिंग करणाऱ्या वाहनांना देखील बंदी घालण्यात आल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी सागर चुटके यांनी दिली.
धबधब्याचा पाण्यात भिजण्याची मजा लुटण्यासाठी राजमाची कडे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होऊ नये यासाठी या मार्गावर फणसराई भागात असलेले ५ ते ६ धबधबे मात्र पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले असून त्याठिकाणी सुरक्षित पर्यटनाचा आनंद पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन वनखात्याकडून करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या मागणीनंतर प्रशासनाचा निर्णय :
खरंतर एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जबाबदार धरले जाते. मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक अतिउत्साहीपणा दाखवतात आणि त्यानंतर कुंडमळ्या सारख्या एखाद्या दुर्घटनेचे बळी ठरतात.
त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत सुरक्षित पर्यटन करणे, ही सर्व पर्यटकांची जबाबदारी आहे. व्यवसायापेक्षा पर्यटकांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याच्या भावनेने राजमाची ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवर पोलीस प्रशासन आणि वनखात्याकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.





