अग्रलेख : विरोधी ऐक्यातले अडथळे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या संबंधातील देशाच्या राजकारणाची सारी चर्चा विरोधकांचे ऐक्य होणार की नाही, या केवळ एका विषयावर येऊन थांबते आणि त्याअनुरूप गणितं मांडली जातात. कालच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आपला पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका स्वबळावरच लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या आधी उत्तर प्रदेशातील आणखी एक मोठा पॉलिटिकल फोर्स समजला जाणारा समाजवादी पक्षही कॉंग्रेस व भाजपला समान अंतरावर ठेवणार असल्याचे त्या पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
नेहमीप्रमाणे केंद्राचे इतके अत्याचार सोसूनही ममता बॅनर्जी किंवा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी विरोधी ऐक्याच्या चर्चेत जराही स्वारस्य दाखवलेले नाही. केरळातील एका साहित्य संमेलनात कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी या विषयावर तपशिलाने भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सन 2019च्या निवडणुकीत भाजपने जो करिश्मा दाखवला होता, तो करिश्मा त्यांना सन 2024 च्या निवडणुकीत दाखवता येणे केवळ अशक्य आहे. भाजपच्या किमान 50 जागा कमी होणार असल्याचे विश्लेषणही त्यांनी नेमकेपणाने केले आहे. तथापि, या स्थितीचा लाभ घेण्यासाठी विरोधी पक्षांचे ऐक्य होईल की नाही यावर आम्हाला काहीही बोलता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच विरोधी ऐक्याच्या बाबतीत शशी थरूरही अनभिज्ञ आहेत. राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ यात्रेने विरोधकांना आशादायक वातावरण निर्माण केले आहे, असे बहुतेक लोक मान्य करीत आहेत. पण राहुल गांधींचे भविष्यातील राजकीय यश हे ते विरोधकांना जवळ आणण्यात किती यशस्वी ठरतात यावर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.
येत्या 30 जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. त्यावेळी देशातील 14 समविचारी पक्षाच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून विरोधी ऐक्याचा पहिला नारा देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जाणार आहे. मागच्याही लोकसभा निवडणुकीच्या वेळी असाच महाआघाडीचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी सर्वच महत्त्वाच्या पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर आले होते, पण प्रत्यक्षात मात्र ही महाआघाडी कागदावरच राहिली आणि यातील प्रत्येक पक्षाने वेगळी चूल मांडून एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि भाजप पुन्हा स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आला. मागच्या दोन्ही निवडणुकांमधील मतदानाचा पॅटर्न लक्षात घेतला तर एक चित्र अगदी स्पष्ट दिसून येते की, भाजपला जवळपास 40 टक्क्यांच्या आसपास मते मिळतात. 60 टक्के मते त्यांच्या विरोधात नोंदवली जातात. पण या 60 टक्के मतांचे विभाजन होऊन भाजप विनासायास सत्तेवर येतो. हा अनुभव लक्षात घेऊन विरोधी मतांमधील फाटाफूट जरी रोखली तरी भाजपला रोखणे विरोधकांना शक्य होणार आहे. पण त्यादृष्टीने कोणी जबाबदारीने प्रयत्नच करताना दिसत नाही हे त्यांचे प्रमुख दुखणे आहे. या स्थितीबद्दल भाजपला दोष देता येत नाही. तुमच्यातच एक वाक्यता नसेल तर त्याला भाजपला जबाबदार ठरवता येऊ शकत नाही. या सगळ्या स्थितीची सगळ्यानांच जाणीव आहे, पण विरोधी पक्षांच्या नेत्यांना मात्र त्याची अजूनही गांभीर्याने जाणीव झालेली दिसत नाही.
वास्तविक लोकसभा निवडणुकीच्या किमान एक वर्ष आधी तरी विरोधी ऐक्याचा बिगुल वाजला तरच त्यांना पुरेशी वातावरणनिर्मिती करून आपले ईप्सित साध्य करून घेता येणे त्यांना शक्य आहे. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना येईपर्यंत त्यासाठी वाट पाहणे हे धोकादायकच ठरते. कारण तितक्या कमी कालावधीत वातावरण निर्मितीला संधी मिळत नाही आणि अगदी आयत्यावेळी झालेल्या ऐक्याला जनता दाद देत नाही. त्यांच्याही मनात मग अशा तकलादू आघाडीविषयी शंका राहते आणि त्यावेळी मतदारही या तकलादू आघाडीच्या बाजूने कौल देण्याऐवजी सरळ मोदींच्या पारड्यात मत टाकून मोकळे होतात. आज संपूर्ण देशात सन 2024 च्या निवडणुकांच्या दृष्टीने पावले टाकणे सुरू झाले आहे. भाजपनेही दिल्लीत बैठक आयोजित करून त्यासाठी रणनीती निश्चित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू झाली असून त्यात सगळ्याच पातळीवरील पक्षाच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. म्हणजेच त्यांनी 2024 ची वातावरणनिर्मिती आतापासूनच सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांतील प्रमुख पक्ष मात्र अजून स्वत:चेच बळ आजमावण्याची भाषा करीत आहेत. सन 2024 च्या निवडणुकीचा सारा खेळ विरोधकांची राजकीय आघाडी किती मजबुतीने लोकांपुढे जाणार यावर अवलंबून आहे.
आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हा त्यांच्यातील एकीचा मुख्य अडसर आहे. अधांतरी राजकीय स्थितीत आपल्याला देशाचे नेतृत्व करण्याची संधी लाभू शकते या अटकळीवर हे सगळे प्रमुख विरोधी पक्षांचे नेते दबा धरून बसले आहेत. म्हणजेच ते पुन्हा स्वत:ची फसगत करून घेण्याच्या तयारीत आहेत, असाच सारा रागरंग दिसतो आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र येऊ अशी एकमुखी हाक या प्रमुख पक्षांनी दिली तर त्यांना केंद्रात सत्ताबदल करणे अजिबात अवघड नाही. शशी थरूर यांच्या म्हणण्याप्रमाणे, भाजपला किमान 50 जागांचा फटका बसणे शक्य आहे. अशा स्थितीत भाजप 250 जागांवर आणि अन्य पक्ष 290 जागांवर जाण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
प्रश्न केवळ असा आहे की या 290 जणांमध्ये एकवाक्यता असेल काय? थरूर यांच्या म्हणण्यानुसार भाजपला जर 50 जागा कमी होऊनही 250 पर्यंत पोहचता येत असेल तर बहुमतासाठी 20-22 खासदारांना आपल्याकडे खेचून घेणे त्यांना अजिबात अशक्य नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर सहज शक्य असूनही विरोधी पक्षांना भाजपला सत्तेवरून दूर करणे अशक्यप्राय ठरणार आहे. काल मायावतींनी स्वबळाचा नारा दिला. अखिलेश यादव यांनी तो आधीच दिला आहे. मग विरोधी आघाडीत कॉंग्रेसखेरीज महत्त्वाचा पक्ष उरतो कोणता? कॉंग्रेसही नेहमीप्रमाणे अजून अंदाज घेण्याच्याच मनःस्थितीत आहे. त्यांना त्यांचे कोणतेही धोरण ठोसपणे जाहीर करता येत नाही. अशा दुबळ्या मानसिकतेने त्यांच्याबरोबर जाण्यास अन्य कोणीही तयार होणार नाही. या पार्श्वभूमीवर 2024 ची निवडणूक पुन्हा मोदींच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे, असे चित्र आतापासूनच निर्माण व्हायला लागले आहे.





