नवी दिल्ली – मागील आठ दिवसापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा अंत लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होणार की नाही? आणि झाले तर ते कशाप्रकारे होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रमुख नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहुमत चाचणीची मागणी करणारं पत्र राज्यपालांना दिल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याशी राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. उभय नेत्यामधील अर्ध्या तासाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. मात्र या भेटीनंतर महाराष्ट्रात आल्यानंतर फडणवीसांनी भाजप नेत्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर राज्यपालांची भेट घेतली आहे. तिकडे, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील सर्व आमदारांसह मुंबईत येणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईत येताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच गुजरातच्या वडोदामध्ये फडणवीस आणि शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. यानंतर फडणवीस यांनी दिल्ली गाठल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांनी अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून समर्थन परत घेत असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राज्यातील घडामोड ही शिवसेनेतील अंतर्गत बाब आहे असे सांगून हात झटकले होते.