Zilla Parishad Election | महापालिका निवडणूकांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहे. याचदरम्यान आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल. लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. १२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच १२ जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे. पंधरा दिवसांची मुदतवाढ राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. याबाबत पंधरा दिवसांची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याआधी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्यातील आरक्षणाच्या स्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून आयोगाला मोठा दिलासा मिळाला. सध्या राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत आहे. मात्र उर्वरित 20 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसंदर्भात 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा आणि सभापती पदांचे आरक्षण यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. हेही वाचा: लाडक्या बहिणींची संक्रांत गोड ! बँक खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात…