पुणे – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारीची कामे गतीने सुरू आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देणे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शासकीय, निमशासकीय संस्थांकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांची माहिती मागविली आहे. या निवडणुकीसाठी 13 तालुके मिळून एकूण सुमारे 23 हजार 700 एवढी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या टप्प्यापासून निवडणुकीच्या कामास सुरुवात होते. मागील एक-दीड महिन्यांपासून मनुष्यबळासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व शासकीय -निमशासकीय, तसेच शैक्षणिक संस्थांकडून कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने मागविली होती. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज आहे. जिल्ह्यात सुमारे 3 हजार 600 मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर एकूण चार कर्मचारी असतात, तसेच ऐनवळी आवश्यकता भासल्यास कर्मचारी कमी पडू नये, म्हणून जादा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये आवश्यक मनुष्यबळ, 30 टक्के राखीव गृहित धरून मनुष्यबळ तालुकानिहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे.