पिंपरी– पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए क्षेत्रात गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील ४ हजार १८६ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११ लाजून ५९ मिनिटांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना घर खरेदीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे. या योजनेत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक गृहनिर्माण योजनांचा समावेश आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पुणे मंडळातर्फे सदनिका वितरणासाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता काढण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरला रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. तसेच २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस, एनएफटी द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत १६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २९९ सदनिका, १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ८६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३२२२ सदनिकांचा समावेश आहे. घरासाठी येथे करा अर्ज कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात आली. यामुळे सदरची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी https://lottery.mhada.gov.in व bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेकरिता मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेबाबत मदतीसाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनाने केले आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही.