Satara: आदिशक्तीच्या जागराने जिल्हा न्हाऊन निघाला भक्तिरंगात!
Satara नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध प्रमुख देवींच्या मंदिरांमध्ये तयारी पूर्णत्वास आली होती. मंदिर परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने शक्तिस्थळांचे रुप पालटले आहे.

Satara: राज्याच्या विविध भागांत पावसाच्या तुटीमुळे दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच जिल्ह्यात आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. श्रद्धा, भक्ती आणि शक्तीच्या उपासनेचा हा सोहळा जिल्ह्यातील विविध देवींच्या शक्तिपीठांपासून ते शहरातील सार्वजनिक मंडळांपर्यंत रंगत आहे. मंदिरांची रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई, बाजारपेठांतील खरेदीची लगबग आणि देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी अशा वातावरणात जिल्हा नवरात्रमय झाला आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध प्रमुख देवींच्या मंदिरांमध्ये तयारी पूर्णत्वास आली होती. मंदिर परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी, आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने शक्तिस्थळांचे रुप पालटले आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे. औंधची यमाईदेवी, वाई तालुक्यातील मांढरदेवची काळुबाई, सातारा शहरानजीकची डोंगरावरील जानाई मळाई, अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवी, जावळी तालुक्यातील घाटवण येथील घाटाई देवी, शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखान्यास्थलावरील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी आणि मंगळवार तळ्यावरील तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा सुरू झाल्या होत्या. पहाटेपासूनच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. घरोघरी महिलांनी सकाळी आठ ते दुपारी अडीच या दरम्यान शुभ मुहूर्तावर घटांची स्थापना केली. घट माती तसेच वेली यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेतही लगबग जाणवली.
सातारा शहरात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची लगबग शिगेला पोहोचली आहे. मोती चौक, गोलबाग, राजवाडा, सदरबाजार यांसह उपनगरांतील विविध भागांत देवीच्या स्वागतासाठी सजावट आणि आगमन मिरवणुकांची तयारी झाली होती. ढोल- ताशांचा गजर, जयघोष आणि उत्साही वातावरणात देवीचे आगमन होताच परिसर भक्तिरंगात रंगून जात होता. भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केल्याने शहरातील प्रमुख स्थळांवर उत्सवी चैतन्य जाणवत आहे.
उपवासाचे पदार्थ, फळांच्या मागणीत वाढ
नवरात्रोत्सवाचा प्रभाव बाजारपेठांमध्येही दिसून येत आहे. पूजा साहित्य, फुले, नारळ, ओटीचे साहित्य आणि उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. महिला सुवासिनींचे उपवास, घटस्थापना आणि नऊ दिवसांच्या धार्मिक विधींमुळे फळांना विशेष मागणी निर्माण झाली आहे. सफरचंद, डाळिंब, केळी यांसह विविध फळांची खरेदी वाढली असून, साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे आणि उपवासाच्या इतर पदार्थांच्या विक्रीलाही वेग आला आहे. एकीकडे पावसाची अनिश्चितता, शेतीवरील संकट आणि दुष्काळाची चिंता, तर दुसरीकडे देवीच्या उपासनेतून मिळणारी मानसिक ऊर्जा, असा विरोधाभास यंदाच्या नवरात्रोत्सवात दिसून येत आहे. संकटांवर मात करण्याचे बळ देणाऱ्या आदिशक्तीवरील अढळ श्रद्धेतून भाविक उत्सवात सहभागी होत आहेत.





