‘कुस्ती महासंघाचे मंडळ बरखास्त करणे हा निव्वळ फार्स’; राष्ट्रवादीच्या पवार गटाची प्रतिक्रीया

मुंबई – केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनियुक्त मंडळाला निलंबीत करणे हा केवळ एक फार्स आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने केली आहे. हा निर्णय घेतल्याने भाजपच्या गैरकृत्याचे पापक्षालन होईल या भ्रमात भाजपने राहू नये, असेही या पक्षाने म्हटले आहे.
क्रीडा मंत्रालयाने निलंबनाचा आदेश जारी करताना असेही म्हटले आहे की नवीन संस्था कुस्तीगीर महासंघाच्याच माजी पदाधिकाऱ्यांच्या संपूर्ण नियंत्रणाखाली काम करत आहे, जे राष्ट्रीय क्रीडा संहितेशी सुसंगत नाही. या संघटनेवर ब्रिजभुषण शरण सिंह यांच्याशीच संबंधीत पॅनेल विजयी झाले आहे.
ब्रिजभुषणवर पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या संघटनेच्या नवनिर्वाचित मंडळाला निलंबीत करण्याने आपल्या पापांचे क्षालन होईल असे भाजपने मानू नये, अशी प्रतिक्रीया पवार गटाचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी दिली आहे.





