पाकिस्तानही श्रीलंकेच्या वाटेवर? रुपयाची अजूनही घसरण सुरूच…

इस्लामाबाद – सध्या श्रीलंकेत जी परिस्थिती आहे, त्याच वाटेवर पाकिस्तान चालला आहे. पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरूच असून आज डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत 240 रुपयांपर्यंत खाली घसरली. कालच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयामध्ये आज 4.48 अंकांनी टक्क्यांनी घट झाली, असे फॉरेक्स असोसिएशन ऑफ पाकिस्तानच्या हवाल्याने पाकिस्तानातील माध्यमांनी म्हटले आहे.
देशातील राजकीय स्थिती आणि चलनाच्या अवमूल्यनाला रोखण्याबाबत सरकारची निष्क्रियता यामुळे पाकिस्तानी रुपयामध्ये ही घसरण झाल्याचे “एक्सचेंज कंपनीज ऑफ पाकिस्तान’चे सरचिटणीस जफर परचा यांनी म्हटले आहे. देशातील राजकीय पक्षांना देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी काहीही चिंता नाही. सरकार केवळ आपली सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात आहे, असे ते म्हणाले.
2022 मध्ये पाकिस्तानी रुपयामध्ये तब्बल 30 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र येत्या एक-दोन आठवड्यांमध्ये पाकिस्तानी रुपयावरील ताण कमी होईल, अशी आशा पाकिस्तानचे अर्थ आणि महसूल मंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी व्यक्त केली आहे. पुढील महिन्यापासून निर्यातीच्या माध्यमातून डॉलर मिळण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे रुपयावरील भार कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
देशातील राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणूक करायला गुंतवणूकदार धाडस करत नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 1.2 अब्ज डॉलरमी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याबाबतची चर्चा अजून अंतिम निष्कर्शापर्यंत आलेली नाही.





