Pakistan : पाकमधील आदिवासींमधील संघर्ष सुरूच ! नव्याने झालेल्या हिंसाचारात १० ठार, २१ जखमी

Pakistan – पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील आदिवासींच्या दोन समुदायांमध्ये शस्त्रसंधी घडवून आणली गेली असली, तरी त्यांच्यातील संघर्ष अजून पुर्णपणे थांबलेला नाही. नव्याने झालेल्या हिंसाचारात किमान १० ठार झाले आहेत आणि २१ जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या कुर्रम जिल्ह्यात हा हिंसाचार झाला. गेल्या आठवड्यात पराचिनार गावाजवळ वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४७ जण ठार झाले होते. त्यानंतर कुर्रम जिल्ह्यातील अलीझाई आणि बागान जमातींमध्ये संघर्ष सुरू झाला होता.
शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या आदिवासी समुदायांमधील हिंसाचारात किमान ३७ लोक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. मात्र या हिंसाचाराची सुरुवात गेल्या गुरुवारी ताफ्यावर झालेल्या ज्या हल्ल्यामुळे झाली, त्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
प्रांतीय सरकारने दोन्ही जमातींमधील ज्येष्ठ नागरिकांच्या मध्यस्थीने रविवारी शस्त्रसंधी घडवून आणली होती. तरीही घोजाघरी, मतसानगर, कुंज अलीझाई परिसरात मंगळवारी तुरळक हिंसाचार सुरू आहे.





