सामाजिक न्याय खाते बंदचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील; अजित पवारांचा संजय शिरसाटांना टोला

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. अशातच मंत्री संजय शिरसाटांनी ‘सामाजिक न्याय खातेच बंद करा’ अशी संतप्त मागणी केली. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टपणे ‘त्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसच घेतील, असं सांगत जबाबदारी झटकली आहे.
अजित पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी थेट सवाल करताच अजित पवारांनी कोणतीही भूमिका न घेता फडणवीसांच्या कोर्टात चेंडू टोलवला. अजित पवारांच्या दौऱ्यात पाणीटंचाईचा प्रश्नही तापला. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक पाणीपट्टी आकारली जाते, तरीही पाण्याचा पुरवठा कोसळलेला. यावर अजित पवारांनी थेट महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्तांकडे बोट दाखवत, ‘हे तुम्ही त्यांना का विचारत नाही?’ असा सवाल केला.
अजित पवारांनी सांगितले की, यंदा राज्यात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो समाधानकारक आहे. दर आठवड्याला कॅबिनेटमध्ये धरणांची व पाणीसाठ्याची माहिती घेऊन आढावा घेतला जातो. टंचाईच्या परिस्थितीत टँकरसंदर्भात तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या चारा टंचाई जाणवत नाही, पण पाण्याची टंचाई आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते संजय शिरसाट?
संजय शिरसाट म्हणाले, माध्यमांमधून मला माझ्या खात्याचे पैसे वर्ग केल्याची माहिती मिळाली. त्याची मला कल्पना नाही. माहिती नाही. परंतु सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करा. हा अन्याय आहे की कट हे मला माहीत नाही. मात्र, या विषयावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.





