शंभर दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय लोकहिताचा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुनरूच्चार

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना इंद्रायणी स्वच्छतेच्या सूचना
आळंदी – मुख्यमंत्री पद हे स्वार्थासाठी नसून ते लोकहिताच्या कामासाठीच आहे, त्यामुळे 100 दिवसांपूर्वी जो काही निर्णय घेतला तो लोकांच्या हितासाठीच घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथे सांगितले.
मृदंगज्ञान शिक्षण संस्था आयोजित पंडित दासोपंत स्वामी आळंदीकर संगीत रौप्य महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पंडित दासोपंत स्वामी यांना मानपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी शांतीब्रह्म मारूती महाराज कुऱ्हेकरर खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहीते, महेंद्र थोरवे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील, आयोजक पंडित दासोपंत स्वामी आळंदीकर, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडेर अजित वडगावकर, मनोहर दिवाणे, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, प्रवचनकार, वादकमंडळी आणि विद्यार्थी साधक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे हजारो मृदंग वादकमंडळीनी मृदंगावर ठेका धरत जंगी स्वागत केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. मी जातीने या इंद्रायणी स्वच्छतेवर लक्ष घालणार आहे. तसेच वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे वैभव असून त्या संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहात आल्यानंतर आत्मिक समाधान प्राप्त होते असे आमचे गुरुवर्य आनंद दिघे आम्हाला कायम सांगत असत. पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा केली तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता.
माऊलींचे घेतले दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरात जाऊन माऊलींच्या समाधीचे पूजन करुन दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, ऍड. विकास ढगे पाटील, व्यवस्थापक माऊली वीर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर मूर्ती, सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ व माऊलींचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.





