भोर । भाटघर धरणपट्ट्यात तरंगता दवाखाना सुरू

भोर । भाटघर धरणक्षेत्रातील रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तरंगत्या दवाखान्याच्या यावर्षीच्या सत्राचे उद्घाटन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भुतोंडे येथे शनिवारी (दि. २८) धनावडे यांनी तरंगत्या दवाखान्याची पाहणी करून या सेवेचा प्रारंभ केला. या वेळी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर, लाँचचालक राजेंद्र कंक, कृष्णा किंद्रे, ग्रामसेवक रणजित ननावरे उपस्थित होते.
भाटघर धरणपट्ट्यातील १३ गावांना या दवाखान्याचा फायदा होणार आहे.
आठवड्यातील बुधवारी आणि शुक्रवारी ही आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. यामध्ये बुधवारी बोपे कंबळे, वाघमाची घुमट, सांगवी, डेरे भुतोंडे या गावांसाठी, तर शुक्रवारी गुहिणी, खुलशी, चांदवणे, डेरे, भांडरवली, मळे, सुतारवाडी, नानवळे या गावांमध्ये ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे भोर शहरापासून ६० किलोमीटरवरील भाटघर धरणपट्ट्यांतील गावांना आरोग्यसेवा देणाऱ्या तरंगत्या दवाखान्याला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत.
“या दवाखान्यामुळे ज्येष्ठांसह लहान मुले आणि महिलांची वैद्यकीय उपचारांसाठीची फरपट थांबली आहे.”
– डॉ. जयदीपकुमार कापसीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, भोर






