लोणीमध्ये कालवाफुटीचे संकट टळले

नागरिकांच्या सतर्कतेमुळे गावकरी बचावले : दुरुस्तीचे काम आजपासून होणार
संबंधित विभागाकडून गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू
लोणी काळभोर (वार्ताहर) – नवा मुठा उजवा कालवा फुटून शेतकरी व नागरिकांचे होणारे लाखो रुपयांचे संभाव्य नुकसान जागरूक नागरिकांमुळे टळले आहे. जलसंपदा विभाग व पोलीस खात्याने तातडीने हालचाली केल्यामुळे मोठा धोका टळला आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत रुपनर वस्ती येथील बिरोबाच्या मंदिरानजिक हा प्रकार घडला आहे.
खडकवासला धरणापासून नवा मुठा उजवा कालवा इंदापूर तालुक्यात जातो. यातून हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील तालुक्यातील 66 हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवले जाते. अनेक वर्षांपासून कालव्याची डागडुजी केली नाही. सतत पाणीपुरवठा सुरू असल्याने डागडुजी करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे हा कालवा अचानक फुटतो. शेतकरी व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. आजही हा प्रकार जागरूक नागरिकांमुळे टळला आहे.
पुणे शहराची हद्द संपल्यावर नवा मुठा उजवा कालवा हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती व त्यानंतर लोणी काळभोर ग्रामपंचायतींच्या हद्दीत प्रवेश करतो. तरवडी मळ्यातून रुपनर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कालव्या खालून जाण्यासाठी एक पूल बांधला आहे. दोन्ही बाजूंना कालव्याच्या मातीच्या भरावाला आधार देण्यासाठी दगडी अस्तरिकरण केले आहे. अस्तरीकरणातील काही दगड निघाले आहेत. दगडांमुळे कालव्यातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ माहिती दिल्यामुळे जलसंपदा विभाग व लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर कालव्यात सोडण्यात येणारे पाणी टप्प्या टप्प्याने बंद केले आहे. या ठिकाणची दुरुस्ती केल्यानंतर कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे.
घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर, उपनिरीक्षक एस. ए. बोरकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, उपविभागीय अभियंता पोपटराव शेलार, भक्ती वाकळे, शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, सरपंच अश्विनी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर यांनी भेट दिली.
तातडीने दुरूस्ती करणार- शेलार
खडकवासला पाटबंधारे उपविभागीय अधिकारी पोपटराव शेलार म्हणाले की, या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून थोडी गळती होत आहे. आज सकाळी जास्त प्रमाणात गळती होऊ लागली होती. त्यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. उद्या पाटबंधारे विभागाचे एक पथक या ठिकाणची पाहणी करणार आहेत. या पथकाच्या अहवालानुसार तातडीने तेथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे.





