“करोना संकटातून देश लवकरच सावरेल”

नवी दिल्ली  – देशात कोविड-19 ची दुसरी लाट सुरू झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ गटाची बैठक झाली. सध्याच्या साथीने उभे केलेले संकट हे शतकातील अभूतपूर्व संकट असून संपूर्ण जगापुढे त्याने मोठे आव्हान निर्माण केले आहे असे मत मंत्रीमंडळ गटाने बैठकीत नोंदवले.

कोविड विरोधात संघर्ष करण्यासाठी सरकारने टीम इंडिया हा दृष्टिकोन ठेवला असून केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि भारतीय जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांवर तो आधारित असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व सरकारी विभाग एकत्रितपणे आणि वेगाने काम करत आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. मंत्र्यांनी संबंधित भागातील लोकांशी संपर्कात राहून त्यांना मदत करावी आणि त्यांचे म्हणणे जाणून घ्यावे अशा सूचना पंतप्रधान मोदींनी यावेळी मंत्र्यांना केल्या. स्थानिक पातळीवर असणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढला जाण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.

गेल्या चौदा महिन्यांमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि भारतातील जनतेने कोविड विरोधी लढ्यात केलेल्या प्रयत्नांचा आढावा मंत्रीगटाने यावेळी घेतला. राज्यांशी वेळोवेळी समन्वय राखत केंद्र सरकारने रुग्णालयातील खाटा, प्राणवायू सुविधा, प्राणवायू उत्पादनाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्या, प्राणवायू साठवणूक आणि वाहतूक, जीवनावश्‍यक औषधे यासारख्या मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी घेतलेले प्रयत्न यावेळी सांगण्यात आले. परिस्थितीची झळ बसू शकणाऱ्या लोकसमूहाला धान्यांच्या स्वरूपातील मदत किंवा जनधन खात्यात दिलेली आर्थिक मदत यासारख्या सहाय्यकारी बाबीही यावेळी नमूद करण्यात आल्या.

भारतात यापूर्वीच लसींचे यशस्वी उत्पादन करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे अनेक लसी मंजुरीच्या आणि वापराच्या विविध टप्प्यावर आहेत असेही यावेळी सांगण्यात आले. आजपर्यंत 15 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण झाल्याचेही यावेळी सांगितले गेले.

मास्कचा वापर, सहा फुटांपर्यंत शारीरिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे यासारखे कोविड सुसंगत वर्तन महत्वपूर्ण असल्याच्या गरजेवर मंत्रीमंडळ गटाने यावेळी भर दिला. या परिस्थितीमुळे समोर ठाकलेले अवघड काम पूर्ण करण्यासाठी समाजाचा सहभाग आवश्‍यक असून या प्रसंगातून देश लवकरच सावरेल, अशी खात्री मंत्रिमंडळ गटाने व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.