IAS Officers : देशाला मिळाले 180 आयएएस अधिकारी; ‘आदित्य श्रीवास्तव’ने मिळवला ऑल इंडिया रँक एक

IAS Officers : भारतीय प्रशासकीय आणि पोलिस सेवांसाठी 2024 हे वर्ष खूप खास होते. या वर्षी देशभरातून 180 आयएएस आणि 200 आयपीएस अधिकारी निवडले गेले. लखनौच्या आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक 1 मिळवला. तर, अनिमेष प्रधानला दुसरा तर अनन्या रेड्डीला तिसरा क्रमांक मिळाला. या नवनियुक्त अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले.
सर्वाधिक अधिकारी कोणत्या राज्यातून आले?
युपीएससी निकालामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून सर्वाधिक यशस्वी उमेदवार ठरले. या राज्यांमध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या रूपात सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे. यूपीमधून सर्वाधिक 27 आयएएस अधिकारी बनवण्यात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानमधील २३ उमेदवार आयएएस अधिकारी झाले आहेत. बिहारमधील 11 आणि मध्य प्रदेशातील 7 उमेदवार अधिकारी झाले आहेत.
टॉप 5 रँकमधील तिघे आयपीएस अधिकारी
यावर्षी टॉप 5 रँकमध्ये असलेले 3 उमेदवार आधीच आयपीएस अधिकारी आहेत. रँक 1 मिळवणारा आदित्य श्रीवास्तव, रँक 4 पीके सिद्धार्थ रामकुमार आणि रँक 5 रौहानी हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत होते.
सेवेत असताना या परीक्षेत आयपीएस अधिकाऱ्याने अखिल भारतीय रँक 1 मिळवण्याची गेल्या 11 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 2013 मध्ये, IPS गौरव अग्रवाल यांनी नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 मिळवला होता.
फक्त 180 आयएएस का?
अधिक चांगल्या संख्येने सक्षम आणि पात्र आयएएस अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी, सरकारने बसवान समितीच्या शिफारशींचे पालन करून सीएसई-2012 पासून नागरी सेवा परीक्षेद्वारे आयएएस अधिकाऱ्यांची वार्षिक संख्या 180 पर्यंत वाढवली. होते. तथापि, समितीने अशी शिफारसदेखील केली होती की, एकाच वेळी 180 हून अधिक आयएएस अधिकारी नियुक्त करणे प्रशासकीय सेवेच्या गुणवत्तेशी तडजोड करण्यासारखे आहे.
तीन टप्पे पार केल्यानंतर आयएएस अधिकारी
युपीएससीद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएस पदांच्या भरतीसाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते, ज्यामध्ये प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत प्रक्रिया यांचा समावेश होतो. दरवर्षी सुमारे 9 ते 10 लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. परंतु त्यापैकी निवडक उमेदवारच ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पद मिळवू शकतात.





