मजुरांच्या प्रवासाचा खर्च पालिका उचलणार

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातून परराज्यात जाणाऱ्या 18 हजार नागरिकांना परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नागरिकांना उरळी कांचन येथून रेल्वेची सोय होणार आहे. पिंपरी-चिंचवड ते उरळी कांचन दरम्यान जाण्यासाठी या नागरिकांना “पीएमपी’च्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, त्याचा संपूर्ण खर्च महापालिका उचलणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे व शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी दिली.
बुधवारी (दि. 6) तहकूब करण्यात आलेली स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. 8) पार पडली. या सभेत या मजुरांना “पीएमपी’ बसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना कलाटे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरात परप्रांतिय मजुरांची संख्या मोठी आहे. करोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हे मजूर त्यांच्या गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने या मजुरांच्या वैद्यकीय तपासणीनंतर तसेच दोन्ही राज्यांच्या परवानगीनंतर त्यांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे.
पिंपरी-चिंचवड अथवा पुणे शहराच्या आसपास या विशेष गाड्या उभ्या करणे, येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची सोय करणे, रुम उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक जागा नव्हती. या सर्व सोयी उरळी कांचन येथे असल्यामुळे त्या ठिकाणाहून परराज्यात जावू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.
शहरातील 18 हजार परप्रांतिय मजुरांना जाण्यासाठी आतापर्यंत परवाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मजुरांना उरळी कांचन येथे जाण्यासाठी लॉकडाऊनमुळे कोणतीच वाहने उपलब्ध नाहीत त्यामुळे “पीएमपी’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. तसेच या प्रवाशांकडून कोणतीही रक्कम घेऊ नये या प्रवासासाठी पीएमपीचा होणारा संपूर्ण खर्च महापालिकेने करावा, असाही निर्णय घेण्यात आल्याचे कलाटे म्हणाले.





