Pune : भूमिपूजनविना रिंगरोड सुसाट

पुणे – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुणे रिंगरोडचे काम गतीने सुरू आहे. मात्र, सुमारे 42 हजार कोटींचा प्रकल्प असलेल्या या रिंगरोडचे भूमिपूजन न करताच या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्व आणि पश्चिम असे रिंग रोडचे दोन भाग आहेत. सद्यःस्थितीत पश्चिम रिंगरोडचे हवेली आणि मुळशी तालुक्यात काम गतीने सुरू आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. या रिंगरोड प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्याचे शासनाने नियोजन होते. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळसुद्धा मागण्यात आली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन होते.
मात्र आता भूमिपूजन न करताच प्रत्यक्ष रिंगरोडचे काम वेळेअगोदर सुरू करण्यात आले आहे. मुळशी, मावळ, हवेली या भागात रिंगरोडच्या कामाने गती घेतली आहे. याठिकाणी जमिनीचे सपाटीकरण, झाडे तोडणे, ओढे-नाले यांचा प्रवाह आहे, त्याठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मोठे पाईप टाकणे, खडीटाकणे आदी कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हा रिंगरोड तयार करण्यासाठी पाच टप्पे करण्यात आले आहे. पाच टप्प्याचे काम एकाच वेळी सुरू करण्यात आले आहेत. जेणेकरून रिंगरोडचे काम गतीने व वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.
महामंडळ म्हणते की, रिंगरोडच्या कामासाठी नऊ कंपन्यांना कार्यादेश (वर्क आॉर्डर) देण्यात आले आहेत. भूमिपूजनासंदर्भात राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. मात्र, कार्यादेश दिल्यानंतर अडीच वर्षांच्या कालावधीत रिंगरोडचे काम पूर्ण करण्याचे आदेश कंपन्यांना देण्यात आले आहेत. जानेवारीपासूनच या सर्व नऊ ठिकाणी कामांना सुरुवात करण्यात आली आहे. अडीच वर्षांच्या काळात काम पूर्ण न केल्यास ठेकेदारांना राज्य सरकारच्या नियमानुसार दंड द्यावा लागणार होता. त्यामुळे काम वेळेत सुरू झाल्यास ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी कंपन्यांची आहे. त्यामुळेच या रिंगरोडच्या कामाला कार्यादेशानंतर तातडीने सुरुवात करण्यात आली असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





