nagar | कट मारल्याच्या रागातून ठेकेदाराला मारहाण

नगर, (प्रतिनिधी) – कट मारल्याच्या रागातून ठेकेदाराला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना एमआयडीसीतील सनफार्मा शाळेजवळ घडली. चंदनकुमार शंभु साह (वय २६ रा. गांधीनगर, बोल्हेगाव, नगर, मुळ रा. बिहार), असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओम नर्हे (पूर्ण नाव नाही, रा. गणेश चौक, बोल्हेगाव) व दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार साह ६ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सनफार्मा शाळेजवळून जात असताना ओमसह तिघे पाठीमागून आले व साह यांना ‘तु आम्हाला कट का मारला’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली.
हाताने व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेत तेथून पळून गेले. जखमी साह यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी ९ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक परदेशी तपास करत आहेत.





