मोदी, शहांचा अत्यंत विषारी प्रचार पराभूत : कॉंग्रेस

नवी दिल्ली : राजधानीत झालेला पराभव पक्षाने स्वीकारला आहे. तळापासून पक्षाची येथे फेरउभारणी करण्यात येईल, असे कॉंग्रेसने आज स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला अत्यंत विषारी प्रचार पराभूत झाला आहे, हा भाजपला मिळालेला धडा आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी माध्यमांना सांगितले.
आमच्या मतातही 22 टक्क्यांवरून पाच ते सहा टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. हे काळजीचे कारण आहे. त्यामुळे पक्षाने तळापासून नव्याने फेरबांधणी करण्याचा निर्णय घेतला असून नवे नेतृत्व समोर आणले जाईल, असे ते म्हणाले.
दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा म्हणाले, भाजप आणि आपकडून ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले. त्यात काही प्रमाणात ते यशस्वी ठरले. मात्र त्याचवेळी दिल्लीची जनता जातीयवादी शक्तींसोबत नाही हेही स्पष्ट झाले आहे. या पराभवाची मी नैतिक जबाबदारी स्वीकारत आहे. मी रोज 20 ते 21 तास काम केले. मी अद्याप थकलो नाही. आम्ही पुन्हा लढू आणि यश मिळवू.
आप सरकारने जाहिरातीवर तीन हजार 192 कोटी रुपये खर्च केले. मात्र जामिया, जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर केलेल्या अत्याचाराबाबत एकही शब्द उच्चारला नाही, याकडे चोप्रा यांनी लक्ष वेधले.
एआयसीसी दिल्लीचे प्रमुख पी. सी. चाको म्हणाले, मोदी आणि शहा यांनी राजधानीत केलेला अत्यंत विषारी प्रचार जनतेने पराभूत केला आहे. आम्ही खूप वाईट पध्दतीने पराभूत झालो आहोत. आम्ही तो अत्यंत नम्र पध्दतीने स्वीकारत येत आहोत. कॉंग्रेस पुन्हा कठोर परिश्रम घेईल आणि पुन्हा परत येईल.





