रेल्वे प्रशासन-नडशी ग्रामस्थांमधील संघर्ष वाढणार

यशवंतनगर – भुयारी मार्गाच्या गैरसोयीमुळे कराड तालुक्यातील नडशी आणि उत्तर कोपर्डे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बंद केलेले रेल्वे गेट क्र. 95 पुन्हा सुरू करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी भुयारी रेल्वे मार्गाचे काम गुरुवारी बंद पाडले. रेल्वे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय बोगद्याचे काम सुरू करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
पर्यायी मार्गाची व्यवस्था करूनच रेल्वेच्या भुयारी पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी नडशी व उत्तर कोपर्डे येथील ग्रामस्थांनी गेल्या महिन्यात रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांची चर्चा घडवून आणून, ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर बोगद्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकार्यांनी दिले होते; परंतु रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत, भुयारी मार्गाचे काम सुरू ठेवले. हे समजताच नडशी येथील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. पर्यायी रस्ता होत नाही, तोपर्यंत हे काम सुरू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन व ग्रामस्थांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
भुयारी पुलाच्या विस्तारीकरणासाठी रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले होते; परंतु यासाठी असलेला पर्याय भुयारी मार्ग ते धुरुंग मळा हा रस्ता अतिशय अरुंद आणि मुरुम, मातीच्या भरावाचा आहे. या रस्त्यावर खाचखळगे पडल्याने तो वाहतुकीसाठी अडचणीचा आहे. आधी रुंदी वाढवून, हा रस्ता पक्का करावा, त्यानंतरच भुयारी मार्गाचे विस्तारीकरण सुरू करण्यात यावे. हा पर्याय शक्य नसल्यास पूर्वीचे गेट नं. 95 पुन्हा सुरू करावे. भुयारी मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामातच पर्यायी रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अरुंद भुयारी मार्गामुळे अपघात
रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्ग सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. बोगदा अरुंद आणि दोन्ही बाजूंनी तीव्र वळणे असल्याने, समोरुन येणारे वाहन दिसत नाही. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून राहते. त्यामुळे वाहतुकीत अडचणी येतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
असा आहे पर्याय…
बोगद्यातील मार्ग चढउताराचा, खोलगट व वळणाचा आहे. अपघात टाळण्यासाठी रेल्वे फाटक क्र. 95 पुन्हा सुरू केल्यास वाहतुकीसाठी सोयीचे होईल. भुयारी मार्गाची रुंदी सहा ते सात मीटर असावी. पुलाच्या दोन्ही बाजूंना लागूनच असलेली तीव्र वळणे काढून, पुलापासून थोड्या अंतरावर केल्यास समोरून येणारे वाहन दिसेल. पर्यायी रस्ता पक्का केल्यास भुयारी मार्गातील वाहनांची वर्दळ कमी होऊन, अपघाताची समस्या आपोआपच सुटेल.
25 जूनच्या आत सर्वेक्षण पूर्ण करून, प्रस्ताव सादर करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी रेल्वेच्या कामात अडथळा आणू नये.
– राकेश शर्मा
एडीईएन, रेल्वे अधिकारी, सातारा





