Pune District : उद्यापासून ग्लोबल कृषी महोत्सव बळीराजाच्या स्वागतासाठी सजली नारायणगाव नगरी

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र येथे ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव 2025चे आयोजन गुरुवार (दि. 9) ते रविवार (दि. 12) दरम्यान करण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.
यावेळी शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पिडीसीसी बँकेचे संचालक अॅड. संजय काळे, आशा बुचके आदी मान्यवर आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
कृषी विज्ञान केंद्राच्या 80 एकर प्रक्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल, परसबाग, पोषण बाग, नैसर्गिक शेती, पीक प्रात्यक्षिके, निविष्ठा निर्मिती, विविध फळे, फुले व भाजीपाला पिकांचे विविध प्रात्यक्षिकांचे डेमो प्लॉटस, चायनीज भाजीपाला पिकातील विविध नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिके, चारापिके, कोंबडी पालनाच्या विविध जाती, तृणधान्य पिकांचे प्रात्यक्षिके बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ड्रोनद्वारे सेंद्रिय निविष्ठा फवारणीची प्रात्यक्षिके, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची विविध दालने, शेतकर्यांना शासनाच्या विविध योजना, कृषीविषयक उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण शेतीतील बाबी, प्रयोगशील शेतकर्यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय आदींची पूरक माहिती दिली मिळणार आहे.
कृषी विषयक परिसंवाद, अनुभवी शेतकरी व यशस्वी उद्योजकांचे व्याख्याने, महिला मेळावा, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ, विचारवंत यांची भेट कृषी प्रदर्शनातून होणार आहे. शासकीय व खासगी क्षेत्रातील नामांकित कृषी निविष्ठा, कृषी साहित्य, कृषी अवजारे उत्पादक कंपन्यांची उत्पादने कृषी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. दरम्यान, कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रगतशील शेतकर्यांचा ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
असे रंगणार कार्यक्रम
गुरुवार दि. 9 जानेवारी सकाळी 11 वाजता उद्घाटन शुक्रवारी (दि.10) सकाळी 11 वाजता नैसर्गिक शेती विषय तर दुपारी निर्यातक्षम केळी तंत्रग्यान व समूह शेती, शनिवारी (दि.11) सकाळी 11 वाजता महिला मेळावा व कृषी आधारित व्यवसायांचे डिजिटल विक्री व्यवस्थापन तर रविवारी (दि.12) जांभूळ लागवड तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्र आयोजित केले असून दुपारी 2 वाजता कृषी प्रदर्शनाच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
फळे, भाजीपाला, धान्य महोत्सव
आपल्या भागातील शेतकर्यांना थेट बाजार पेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फळे, भाजीपाला आणि धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी वेगवेगळ्या सेंद्रिय डाळी, विविध भरड धान्याची विक्री कृषी प्रदर्शनात होणार आहे. महिला बचत गटा मार्फत तयार केलेले लोणचे, पापड, मसाले, कुर्दी, पापड्या, मिलेटसचे पदार्थ, खवयांसाठी व्हेज व नॉनव्हेज उपलब्ध असणार आहे. कृषी महोत्सवासाठी नाबार्ड, आत्मा कृषी विभाग, जिल्हा परिषद पुणे, भीमाशंकर व विघ्नहर सहकारी साखर कारखाना, कृषी पणन मंडळ, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया यांनी सहकार्य केले आहे. कार्यक्रमासाठीच्या अधिक माहितीसाठी प्रा. राहुल घाडगे 9422080011 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी केले आहे.





