सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावे; ममता बॅनर्जी यांनी केले आवाहन

कोलकाता – केंद्र सरकारच्या एकाधिकारशाहीच्या कारभाराच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्यांनी हे आवाहन करताना शोलेतला डॉयलॉगही ऐकवला आहे.
जो डर गया समझो मर गया असे म्हणत त्यांनी केंद्राच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारला राज्यांवर आपली मनमानी करताच येणार नाही. या बाबतीत केंद्र व राज्य सरकारांमध्ये लक्ष्मणरेषा आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांनीही ते मान्य केले होते व सरकारीया कमिशनच्या अहवालातही ही बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. नंतर हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना आपल्या अधिकाराची जपणूक करण्यासाठी एकजुटीने पुढे आलेच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदींच्या राजवटीत फेडरलिझमची धज्जीया उडवली जात आहे. चर्चेची किंवा सल्लामसलतीची प्रक्रियाच थांबली आहे. काल पंतप्रधान मोदींच्या सरकारने बंडोपाध्याय यांना खुलासा करण्याची नोटीस बजावून जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे. मोदींना असले सल्ले देतो कोण असा सवालही त्यांनी केला आहे. ममतांकडून तुम्ही पराभूत झाला आहात म्हणून त्याचा बदला या पद्धतीने तुम्ही घेत आहात काय असा सवालही ममतांनी उपस्थित केला आहे.





