पुणे जिल्हा : आळंदीत मुख्यमंत्र्यांच्या “त्या’ वक्तव्याचा निषेध

– महायुतीतील घटक पक्षांकडून सभेचे आयोजन
आळंदी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. २८) एका मुलाखतीत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, शिंदे आणि पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री संवाद साधण्यात कमी पडतात. मुख्यमंत्री यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ आळंदी येथे शुक्रवारी (दि. ३०) शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महायुतीतील घटक पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशी वक्तव्ये भविष्यात टाळण्याचे आवाहन केले.
महाद्वार प्रांगणात निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आळंदी नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, सौरभ गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल चव्हाण, विभागप्रमुख राहुल थोरवे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, शाखाप्रमुख रोहिदास कदम, शाखाप्रमुख नितीन ननवरे, दिनकर तांबे, शंकरराव घेनंद, माजी नगरसेवक मृदुल भोसले पाटील, विनायक महामुनी, निसार सय्यद, खेड प्रवक्ते आरिफ शेख, सायरा शेख,संतोष शेवाळे,विशाल तापकीर,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे संयोजन सौरभ गव्हाणे, राहुल चव्हाण आणि मृदुल भोसले पाटील यांनी केले.
“संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की, लॉकडाऊनच्या काळात वर्षा बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही थांबावे लागत होते, प्रवेश मिळत नव्हता. त्या वेळी एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि लोकांचे जीव वाचवले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्रजींचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. –
राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, शिवसेना आळंदी शहरप्रमुख
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनिय आहे. दोन्ही पक्ष एनडीएचे घटक आहेत. त्यांच्याबाबत असे वक्तव्य केल्याने कार्यकर्त्यांचे मन दुखावले आहे.
– डी. डी. भोसले पाटील, माजी विरोधी पक्षनेते





