Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो.! नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान

Narayan Rane | Nitesh Rane – ‘मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे’, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते.
त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते. राणे म्हणाले, ‘मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो’.
मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा. नारायण राणे हे धाराशिव येथे आले होते. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणाचा निधी अडवणे हे चुकीचे आहे, त्याबद्दल मी सूचना देणार असल्याचे देखील राणे यांनी म्हटले आहे.
प्रकाश महाजन हा मेंटल माणूस…
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो क्रांती चौकात, त्याला भेटायला मी यायचे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, याबद्दल मला माहीत नाही. ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे.





