New District : मुख्यमंत्र्यांकडून नव्या जिल्ह्याची घोषणा; नाव जाहीर

New District in Goa : देशातील सर्वात छोटे राज्य म्हणून ओळख असलेल्या गोव्यात आतापर्यंत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे अस्तित्वात होते. मात्र आता गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची भर पडणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नव्या जिल्ह्याच्या निर्मितीची अधिकृत घोषणा करत, त्या जिल्ह्याचे नावही जाहीर केले आहे.
गोव्यात गेल्या काही काळापासून नवीन जिल्हा निर्मितीबाबत चर्चा सुरू होती. यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करून अहवालही मागवला होता. अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात निर्णय घेत तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा केली. गोव्याच्या पुरातन भौगोलिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे प्रतीक असलेल्या कुशावती नदीच्या नावावरून नव्या जिल्ह्याला ‘कुशावती’ असे नाव देण्यात येणार आहे.
या नव्या कुशावती जिल्ह्यात धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण हे चार तालुके तसेच एकूण 115 गावांचा समावेश असेल. नव्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे येथे असणार आहे. मात्र तोपर्यंत प्रशासकीय इमारती, कार्यालये आणि मनुष्यबळाची व्यवस्था पूर्ण होईपर्यंत मडगाव येथील साल्ढाणा प्रशासकीय संकुलातील दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातूनच कुशावती जिल्ह्याचा कारभार चालवला जाणार आहे.
Goa gets its Third District: Kushavati
The creation of Kushavati, Goa’s third district is a historic step towards stronger governance and balanced regional development. pic.twitter.com/kCXeQCU9N0
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) December 31, 2025
31 डिसेंबरपूर्वी निर्णय घेण्याचे बंधन
गोवा सरकारवर 31 डिसेंबर 2025 पूर्वी नवीन जिल्हा निर्मितीचा निर्णय घेण्याचे बंधन होते. 1 जानेवारी 2026 ते मार्च 2027 या कालावधीत होणाऱ्या जनगणनेमुळे जिल्ह्यांच्या सीमा बदलण्यावर केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. तसेच फेब्रुवारी 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने 31 डिसेंबर रोजी तडकाफडकी या नव्या जिल्ह्याची घोषणा केल्याचे सांगितले जात आहे.



