संकल्पपूर्ती! नवा जिल्हा निर्माण होताच ‘त्याने’ केली तब्बल वीस वर्षानंतर दाढी

रायपुर : छत्तीसगडमध्ये मनेंद्रगड या नव्या जिल्ह्यांची निर्मिती होताच रामाशंकर नावाच्या एका समाजसेवकाने तब्बल वीस वर्षानंतर दाढी करून एक शपथ पूर्ण केली. जोपर्यंत छत्तीसगडमध्ये या जिल्ह्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही, अशी शपथ वीस वर्षांपूर्वी रमाशंकर यांनी घेतली होती.
राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गेल्या आठवड्यात छत्तीसगडमध्ये नव्या जिल्ह्यांची निर्मिती करत असल्याची घोषणा केली. त्यामध्ये मनेंद्रगडचाही समावेश असल्याने रमाशंकर यांची शपथ अखेर पूर्ण झाली आणि त्यांनी वीस वर्षानंतर दाढी केली. 2000 मध्ये जेव्हा छत्तीसगड हे मध्य प्रदेश पासून अलग होऊन स्वतंत्र राज्य झाले तेव्हापासूनच रमाशंकर यांनी नव्या राज्यांमध्ये मनेंद्रगडला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती.
त्या मागणीकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केल्याने तेव्हाच रमाशंकर यांनी शपथ घेतली होती कि जो पर्यंत मनेन्द्रगड जिल्हा होणार नाही तोपर्यंत मी दाढी करणार नाही. गेल्या आठवड्यात हा निर्णय झाल्याने आनंदी झालेल्या रमाशंकर यांनी उत्साही वातावरणात दाढी केली. यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करून रमाशंकर यांचे स्वागत केले. शहरात मिरवणूक काढून जिल्हा निर्मितीच्या घोषणेचे स्वागत करण्यात आले.




