विमानाची तिकीटे काढून देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

पुणे – विमानाची तिकीटे काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. सरबजीतसिंग व्होरा असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीने बाणेर परिसरातील एका व्यक्तीला 1 लाख 17 हजारांचा गंडा घातला होता. याप्रकरणी सप्टेंबर 2018 मध्ये अनिल पुरुषोत्तम लिमये (ऱा.बाणेर) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

लिमये यांना पर्यटनासाठी कुटूंबासह दुबईला जायचे होते. त्यानुसार त्यांनी जस्ट डायलवर विमानाची तिकीटे बुकिंग करून देणाऱ्या एजंटची माहिती घेतली होती. त्यावेळी त्यांना विशाल टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सचे सरबजितसिंग व्होरा यांचा नंबर मिळाला. यावेळी दुबईला जाण्यासाठी चार तिकीटाचे 1 लाख 17 हजार रुपये लागतील असे व्होरा यांनी लिमये यांना सांगितले होते. लिमये यांचा विश्‍वास संपादन करत व्होरा यांनी त्याची सहकारी महिलेच्या नावाने धनादेश घेतला. मात्र, त्यानंतर लिमये यांना विमानाची तिकीटे न देता त्यांची फसवणूक केली. तेव्हा पासून दोघेही फरार होते.

बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाला व्होरा हा कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने विमान तिकीटे देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे कबूल केले. पुढील तपासासाठी त्याला चतुःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सुनिल तांबे, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप जमदाडे, कर्मचारी संतोष पागार, हरीष मोरे, नवनाथ डांगे, कैलास डुकरे, रुपेश पिसाळ, किरण तळेकर, नितीन साळुंके, सागर जगताप, गौरव उभेयांच्या पथकाने केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×