Sharad Pawar: “ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती”, शरद पवारांंनी स्पष्ट केली भूमिका
Sharad Pawar: शरद पवार हे दुष्काळी भागातील परिस्थितीची माहिती घेणार

Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली.
“सध्या शेतकरी आणि जनता भीषण पाणी व चाऱ्याच्या समस्येला तोंड देत आहे. त्यामुळे यंदा आमच्याकडे कोणतीही दिवाळी साजरी होणार नाही, माझे संपूर्ण लक्ष दुष्काळ निवारणावरच केंद्रित आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यासह दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले. माळेगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार हे दुष्काळी भागातील परिस्थितीची माहिती घेत असून, आज माढा तालुक्यातील दुधाळी परिसराला भेट देणार आहेत. “सोलापूर जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर माढा तालुक्यात ११० टँकर सुरू आहेत. ही एका जिल्ह्यातील परिस्थिती आहे. पाणी आणि चाऱ्याची अत्यंत गरज असून, नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या गरजा जाणून घेणार आहे. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून, राज्य सरकारकडे मदतीसाठी पाठपुरावा करणार आहे,”असे पवार म्हणाले.
प्रकल्प आला म्हणजे पाणी संपले असे होत नाही
तसेच नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दिल्ली दरबारी चर्चा झाली असून त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उजनी येथील प्रस्तावित एआय प्रकल्पाबाबत बोलताना, “प्रकल्प आला म्हणजे पाणी संपले असे होत नाही, तरीही पाण्याचा वापर जपूनच व्हावा लागेल. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या जातील. या प्रकल्पाची माहिती घेणार असून, काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबत विचार केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्यावतीने आज १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी सरकारला सुनावले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेण्याची गरज होती
“ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज होती. त्याच्यामुळे आज आणि उद्या सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे आणि स्थानिक नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, सध्या माझे प्राधान्य केवळ शेतकरी, पाणी, चारा आणि दुष्काळाच्या प्रश्नांनाच आहे,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:
Delhi rally: ‘याच दिवशी रामलीला मैदानावर रॅली का?’ ; जेपी नड्डांचा विरोधकांना सवाल






