47 जणांच्या मृत्यूचे प्रकरण तापले ! विषारी दारूप्रकरणी तामिळनाडू विधानसभेत गदारोळ

चेन्नई – तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध देशी दारू पिऊन झालेल्या मृत्यूंवरून खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजारी पडलेल्यांपैकी ३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये नाराजी तर आहेच, शिवाय राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. चेन्नईत तामिळनाडू विधानसभेच्या आत आणि बाहेर एआयएडीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर निदर्शने केली. आंदोलक आमदारांना हटवण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या मुद्द्यावर सभागृहाला माहिती दिली. ते म्हणाले की, तामिळनाडू सरकारने तातडीने कारवाई केली आहे. त्यानंतरही अण्णाद्रमुकचे सदस्य येथे गदारोळ करत आहेत. ते विधानसभेच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती बी गोकुळदास यांचा समावेश असलेल्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचा अहवाल ३ महिन्यांत सादर केला जाईल.
विधानसभेच्या आत आणि बाहेर निदर्शने
निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एडप्पाडी के पलानीस्वामी यांनीही याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
याआधी शुक्रवारी तामिळनाडू विधानसभेत एआयएडीएमकेने प्रश्नोत्तराच्या तासात दारू घोटाळ्यासह अनेक मुद्दे उपस्थित करण्याची मागणी केली. त्यांनी बराच गदारोळ केला. यानंतर एआयएडीएमके सदस्यांना दिवसभरासाठी सभागृहातून बाहेर काढण्यात आले.
मात्र, काही वेळानंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या आवाहनानंतर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय मागे घेतला. कल्लाकुरिची प्रकरणावर एआयएडीएमकेची मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आतापर्यंत काय पावले उचलली?
१. विषारी दारु प्रकरणात ४९ वर्षीय अवैध दारू विक्रेते के. कन्नूकुट्टी यांना अटक
२. 200 लिटर अवैध दारूच्या तपासणीत त्यात घातक ‘मिथेन’ सापडले
३. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
४. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे या घटनेची सीबीआय-सीआयडी चौकशी करण्याचे आदेश
५. कल्लाकुरिचीचे जिल्हा दंडाधिकारी श्रावणकुमार जटावथ यांची बदली
६. पोलिस अधीक्षक समय सिंह मीना निलंबित
७. कल्लाकुरिची दारूबंदी शाखेसह इतर नऊ पोलिसही निलंबित





