पुणे | पाठीवरील दप्तराचे ओझे वाढणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, अंतर्गत विद्याशाखा विषय बंधनकारक करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता एकूण १२ विषयांचा अभ्यास करावा लागणार असून, पाठीवरील दप्तराचे ओझे वाढणारच आहे.
नवीन राष्ट्र्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यास सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याचा प्रश्न अनेकदा चव्हाट्यावर येत असतो. ते कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने नवनवीन शोधही लावले. मात्र, ओझे कमी होण्याएवजी वाढतच चालले आहे. इयत्ता नववी, दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे.
त्यामुळी आधीच्या विषयात आणखी काही विषयांची वाढ होणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण, स्काऊट गाइड या विषयात अतिरिक्त ३ विषयांच्या अभ्यासक्रमाची भर पडणार असल्याने इयत्ता नववी व दहावीसाठी एकूण विषय १२ होतील. त्यामुळे शाळेच्या वेळा देखील वाढण्याची शक्यता आहे.
नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय भाषांचा समावेश सक्तीचा आहे. शाळांकडून याबाबत सूचना आल्यानंतरच हा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.
व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून दिली जाईल.
दहावीला बाग, सुतारकाम यांसारख्या व्यवसायाची माहिती देण्यात येईल. कला शिक्षणातून दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला हे विषय शिकविले जाणार आहेत.
उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या देश पातळीवरील प्रवेश परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना सुलभ होण्यासाठी विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी, व्यावसायिक शिक्षणासारख्या विषयांची पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके जशीच्या तशी स्वीकारण्यात येतील.
मराठी, इतिहास, भूगोलसारख्या विषयांबाबत पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके राज्याला तयार करावी लागतील. एनसीईआरटीकडील पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य, हस्तपुस्तिका याची निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने करावी.
इतिहास, भूगोलसारख्या विषयांचा पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके तयार करताना आशयाचे प्रमाण स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, जागतिकदृष्ट्या पूरक ठरवावे लागणार आहे.
दहावीचे मूल्यमापन बोर्डाकडेच
सर्व भाषा विषयांसाठी जवळपास समान तासिका आहेत. इयत्ता नववीमधील सर्व विषयांचे मूल्यमापन शाळास्तरावर होईल व इयत्ता दहावीमधील सर्व विषयांचे मूल्यमापन व परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येईल. इयत्ता दहावीनंतर अंतिम निकालपत्रक राज्यमंडळ जाहीर करणार आहे.





