चमकोगिरीसाठी नगरसेवकांकडून चाचण्यांचा भार पालिकेवर

पुणे – शहरात करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा सध्या स्थिर आहे. पर्यायाने चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, याचा फायदा घेत काही नगरसेवक सोसायट्यांमध्ये करोना चाचणी शिबिरे भरवत आहेत. परिणामी, त्याचा ताण आणि आर्थिक भार महापालिकेवर येत आहे. त्यामुळे यापुढे केवळ “सुपरस्प्रेडर’ ठरू शकणाऱ्या व्यक्तींच्याच चाचण्या घ्याव्यात, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आरोग्य विभागास दिले आहेत.
शहरात सध्या करोनाच्या हा नवीन बाधितांचा आकडा दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत 9 ते 10 टक्क्यांपर्यत स्थिर आहे. परिणामी, नवीन बाधित घटल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी अडीच ते चार हजार चाचण्या होत आहेत. त्यात, बाराशे चाचण्या या शासकीय, तर काही खासगी प्रयोगशाळेत होत आहेत.
तर पालिकेची शहरात 17 करोना चाचणी केंद्र सुरू आहेत. मात्र, घटलेल्या या चाचण्यांचा फायदा घेत काही नगरसेवक आरोग्य विभागावर दबाव आणून खासगी सोसायट्यांसाठी स्वतंत्र शिबिरे भरवत आहेत. तेथे सरसकट सदस्यांच्या चाचण्या सुरू आहेत. केवळ लक्षणे असलेल्या, करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याच चाचण्या कराव्यात, असे शासनाचे आदेश आहेत. तरीही, नगरासेवक या चाचण्यांची थेट शिबिरेच भरवत आहेत.
आरोग्य विभागाने कोणत्याही सोसायट्यांसाठी शिबिरे घेऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. दिवाळीनंतर केवळ सुपरस्प्रेडर ठरू शकणारे हॉटेल व्यावसायिक व कर्मचारी, व्यापारी व व्यावासायिक, त्यांचे दुकानातील कर्मचारी, तसेच महापालिका आणि पीएमपीतील लोकांशी संपर्क येणारे कर्मचारी यांच्यासाठी शिबिरे घेण्याच्या सूचना आहेत.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा





