बिगुल वाजले…, परेड सावधान…; राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दीक्षांत समारंभात छात्राचा संचलन सोहळा

पुणे – कडाक्याची थंडी, त्यात मैदानावर पसरेलेले धुके…त्या धुक्यातून बिगुल वाजले आणि परेड सावधान असा आवाज घुमताच सर्वजण स्तब्ध झाले…आणि सुरू झाला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील खेत्रपाल मैदानावर दीक्षांत समारंभातील छात्राचे नेत्रदिपक संचलन सोहळा…याची देही याची डोळा हे संचलन पाहताना देशप्रेमाने ऊर भरून येते. यावेळी चेतक हेलिकाॅप्टर आणि सुखोई लढाऊ विमानांची तिरंगी सलामी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अकादमी (एनडीए) येथे १४७ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज (दि. ३०) दिमाखात संपन्न झाला. लष्कराच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्विकारली. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरूचरण सिंग, डेप्युटी कमांडंट एअर व्हाईस मार्शल सरताज बेदी यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात एक हजार २६५ कॅडेट्स सहभागी झाले. तसेच, तीन वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ३५७ कॅडट्सचा समावेश होता. यामध्ये २१५ आर्मी, ३८ नौदल आणि हवाई दलाच्या १०४ कॅडेट्स तर मित्रराष्ट्र भूतान, ताजिकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, मलेशिया, सुदान, टांझानिया, केनिया, झांबिया आणि मालदीव या देशांमधील १९ कॅडेट्सचा यामध्ये सहभाग होता. तसेच, एडीएमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या ४७ महिला कॅडेट्सही या दिमाखदार संचलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.
अंतिम पग ओलांडताच छात्रांचा जल्लोष
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेली तीन वर्षे एनडीएमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी छात्रांनी प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाल्यावर शिस्तबद्ध पद्धतीने अंतिम पग ओलांडत म्हणजे अंतीम पायरीकडे निघाले. अंतीम पायरी चढली म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीचे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात दाखल होतो, अशी मान्यता आहे. यावेळी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी छात्रांना सलामी दिली. त्यानंतर छात्रांनी जल्लोष केला.





