आणीबाणीतच संविधानाची मोडतोड; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतरचे पहिले विशेष अधिवेशन आज संपले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत क्रमशः काल आणि आज राष्ट्रपती अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. बुधवारी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा आणीबाणीचा उल्लेख केला. या आणीबाणीच्या काळात संविधानाची मोडतोड करण्यात आली. तसेच या काळात झालेल्या तीन संशोधनांना मिनी कॉन्स्टीट्यूशन म्हटले जात असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. यावेळी विरोधकांनी सभात्याग केलेला होता. विरोधी बाकांवर इंडिया आघाडीचा एकही सदस्य नव्हता.
नरेंद्र मोदी म्हणाले, संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह अजूनही सुरुच राहणार का? 1977ची निवडणूक विसरले का? वृत्तपत्र बंद, रेडिओ बंद, बोलण्यावर बंदी, तेव्हा एकाच मुद्यावर देशातील नागरिकांनी मतदान केले होते, लोकशाहीची पुनर्स्थापन करण्यासाठी मतदान झाले होते. संविधानाच्या रक्षणासाठी संपूर्ण जगात एवढी मोठी निवडणूक झाली नाही. भारतीयांच्या रक्तात लोकशाही कशी जिवंत आहे हे 1977च्या निवडणुकीतून दिसले होते. आणीबाणी आम्ही फार जवळून पाहिली आहे. कोट्यवधी लोकांना यातना दिल्या गेल्या. त्यांचे जगणे अवघड करुन टाकले होते.
जे संसदेत घडले ते तर रेकॉर्डवर होते. तसेच भारतीय संविधानाच्या रक्षणाबद्दल बोलणाऱ्यांना मी विचारु इच्छितो की आपल्याकडे दर पाच वर्षांनी निवडणुकीचा नियम आहे, जेव्हा तुम्ही लोकसभा सात वर्षे चालवली तेव्हा कोणते संविधान होते? जे तुम्हाला सात वर्षे सत्तेची मौज आणि लोकांवर अन्याय करु देत होते? आणि आता तुम्ही आम्हाला संविधान शिकवणार का? असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला. नरेंद्र मोदी म्हणाले, संविधानाचा आत्मा चिरडण्याचे पाप या लोकांनी (काँग्रेस) केले आहे. संविधानात 38, 39 आणि 42वी घटनादुरुस्ती करण्यात आली. याला ते मिनी कॉन्स्टीट्यूशन म्हणून पाहात होते. तुमच्या तोंडी संविधान रक्षणाची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.





