पुणे | तरुणीचे अवयव कापून धड नदीपात्रात फेकले

पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – तरुणीचा खून करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले आहे. खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी परिसरात एक बांधकाम सुरू आहे. तेथून जवळच असलेल्या नदीपात्रात महिलेचे हात, पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली.
मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे धडापासून शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले आहेत. त्यानंतर हे धड नदीपात्रात टाकून दिले.
पोलिसांनी परिसरात मृतदेहाचे इतर अवयवय शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आढळले नाहीत. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
खुनाचा छडा लावण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकाबरोबरच गुन्हे शाखेची पथके देखील आरोपीचा माग काढत आहेत, अशी माहिती चंदनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक अनिल माने यांनी दिली.





