जगातील पहिलीच घटना! करोनाच्या ‘अँटिबॉडिज’सह बाळाचा ‘जन्म’

न्यूयॉर्क, दि. 18 – जगभरात वर्षाहून अधिक काळापासून करोनाने अक्षरशः कहर केलेला आहे. सध्या करोनावर लस आली असून सर्वत्र लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. त्यातच अमेरिकेत जन्म झालेल्या एका नवजात बालकाच्या शरीरात करोना व्हायरसच्या अँटिबॉडिज असल्याचा दावा अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, या नवजात बाळाच्या आईला गरोदरपणात करोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.
जीवघेण्या करोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. परंतु, अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञांनी केलेल्या दाव्यामुळे एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. आरोग्य विज्ञान संबंधित ईप्रिंट प्रकाशित करणाऱ्या “मेडआर्काइव’वर प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, बाळाच्या आईला गरोदरपणाच्या 36व्या आठवड्यात मॉडर्ना लसीचा डोस देण्यात आला होता. लसीचा डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी महिलेने एका निरोगी बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये बाळाच्या रक्तात अँटिबॉडिज आढळून आल्याचा खुलासा करण्यात आला.
अमेरिकेतील फ्लोरिडाच्या अटलांटिक विश्वविद्यालयाचे सह लेखक पॉल गिल्बर्ट आणि चाड रूडनिक म्हणाले, एखाद्या नवजात बाळाच्या शरीरात करोनाच्या अँटिबॉडिज आढळण्याचे हे पहिले प्रकरण असल्याचे समोर येत आहे. बाळाची आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून बाळाची आई बाळाला नियमितपणे स्तनपान करत आहे. तसेच बाळाच्या आईला नियमांनुसार, लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यात येणार आहे.
दरम्यान, अद्याप या संशोधनाचे पुनरावलोकन करण्यात आलेले नाही. याआधीच्या एका संशोधनात करोनामुक्त झालेल्या गरोदर स्त्रियांच्या पोटातील बाळाच्या शरीरात अँटिबॉडिज पोहोचवण्यात आईशी जोडलेली नाळ अयशस्वी ठरत असल्याचे सांगण्यात आले होते. अशातच, या नव्या संशोधनात सांगण्यात आले आहे की, जर आईला करोनाची लस देण्यात आली असेल, तर त्यामुळे करोनाच्या अँटिबॉडिज बाळाच्या शरीरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला करोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो.





