The Bengal Files Trailer : 5 सप्टेंबरला रिलीज होणार ‘द बंगाल फाइल्स’… पण वाद थांबणार का? पहा ट्रेलरमध्ये काय

कोलकाता : दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँच इव्हेंटदरम्यान कोलकात्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. शनिवारी दुपारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नियोजित असलेल्या या कार्यक्रमाला पोलिसांनी मध्येच अडवले, त्यामुळे इव्हेंटला तब्बल एक तास उशीर झाला. यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा प्रकार हुकूमशाही आणि लोकशाही हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.‘
द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट १९४६ च्या कोलकाता दंगली आणि अविभाजित बंगालमधील सांप्रदायिक हिंसाचारावर आधारित आहे. या चित्रपटाला यापूर्वीच अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. ट्रेलर लाँचपूर्वीच कोलकात्यातील एका प्रमुख सिनेमागृहाने राजकीय दबावामुळे कार्यक्रम रद्द केला होता. त्यानंतर हा इव्हेंट आयटीसी रॉयल बंगाल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला, पण तिथेही गोंधळ घडला. अग्निहोत्री यांनी माध्यमांना सांगितले की, “काही लोकांनी हॉटेलमधील वीजेचे तार तोडले, ज्यामुळे ट्रेलर प्रदर्शन थांबवण्यात आले. हा सगळा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून होत आहे, हे सर्वांना माहीत आहे. आमची आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे, पण मी शांत बसणार नाही.”
अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाला अशा प्रकारे अडवले जाणे चुकीचे आहे. पश्चिम बंगालमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? आम्ही जे बनवले आहे, ते दाखवण्याचा आम्हाला अधिकार आहे. कश्मीरमध्येही असा प्रकार घडला नव्हता, मग बंगालमध्ये असे का होत आहे?” त्यांनी प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहून बंगालमधील सत्य जाणून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
कोलकाता पोलिसांनी मात्र याबाबत वेगळी भूमिका घेतली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या इव्हेंटसाठी आवश्यक असलेले मनोरंजन परवाना (अम्युझमेंट लायसन्स) आयोजकांकडे नव्हता, तसेच स्थानिक पोलिसांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्हाला हस्तक्षेप करावा लागला.” तरीही, अखेरीस हॉटेलमध्ये ट्रेलर लाँच यशस्वीपणे पार पडले आणि ते झी स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आले.
हा चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’नंतर अग्निहोत्री यांच्या ‘फाइल्स’ त्रयीचा तिसरा भाग आहे. यात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले असून, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय हस्तक्षेप यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अग्निहोत्री यांनी यापूर्वीही अशा अडचणींचा सामना केला आहे, परंतु त्यांनी ठामपणे सांगितले की, “सत्य दडपले जाऊ शकत नाही. ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट बंगालच्या इतिहासातील एक गडद पर्व उजागर करेल.” आता हा चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित वाद पुढील काळात काय वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तृणमूल काॅंग्रेसचा काय आक्षेप आहे
तृणमूल काँग्रेसचा (TMC) ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटावर आक्षेप आहे की, हा चित्रपट सांप्रदायिक विद्वेष पसरवतो आणि पश्चिम बंगालमधील सामाजिक सौहार्द बिघडवू शकतो. विशेषतः, चित्रपटाच्या टीझरमधील माँ दुर्गा यांच्या मूर्तीला आग लावलेले दृश्य आणि माँ कालीशी संबंधित काही संवेदनशील दृश्यांना त्यांनी सांस्कृतिक भावनांचा अवमान मानले आहे. TMC ने यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, निर्माती पल्लवी जोशी आणि अभिषेक अग्रवाल यांच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल केल्या आहेत. त्यांचा दावा आहे की, हा चित्रपट १९४६ च्या दंगलींवर आधारित असला, तरी तो निवडणुकीपूर्वी सांप्रदायिक तणाव वाढवू शकतो.





