घंटा नाद ठीक, मात्र… – अजित पवार संतापले

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरामध्ये आज जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता आपल्या राहत्या घराच्या आवारातून घंटा नाद करत कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ आणि पोलिसांचे आभार व्यक्त केले. मात्र ही घंटा नाद करण्याची ‘पद्धत’ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुचलेली दिसत नाही. याबाबत सविस्तर वृत्त असं की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी गर्दी टाळण्याची आवश्यकता असताना काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी गर्दी करत ‘घंटा नाद’चा कर्यक्रम केला. घंटा नाद करताना झालेल्या गर्दीमुळे अजित पवार चांगलेच रागावले असून त्यांनी आपला संताप ट्विटरद्वारे व्यक्त केलाय.
याबाबत व्यक्त होताना ते लिहतात, “कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार! जनतेनं आपल्या घरातून घंटानाद,थाळीनाद करून त्यांचे आभार व्यक्त केले,त्यांचेही आभार! परंतु,लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून,एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही. लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणं टाळण्याची गरज आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं.”
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांचा हा टोला नेमका कोणत्या लोकप्रतिनिधींसाठी होता हे अद्याप स्पष्ट झालं नाही. कोरोना विषाणू हा अत्यंत संसर्गक्षम असल्याने अजित पवारांनी उपस्थित केलेला हा मुद्दा वैध असून अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे चुकीचेच असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत.
कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा,पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार! जनतेनं आपल्या घरातून घंटानाद,थाळीनाद करून त्यांचे आभार व्यक्त केले,त्यांचेही आभार! परंतु,लोकप्रतिनिधी व जनतेनं रस्त्यावर उतरून,एकत्र येऊन हा घंटानाद करणं अपेक्षित नाही.
#IndiaFightsCorona— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 22, 2020





