Maharashtra Politics | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय हालचाल घडू शकते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) युतीची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. डोंबिवलीतील पलावा उड्डाणपूल अद्याप वाहतुकीसाठी खुला न झाल्याने नागरिकांत संताप आहे. त्याविरोधात आज शनिवार शिवसेनेच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांच्या सहभागाची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाला नव्याने उधाण आले आहे. शिवसेनेकडून सांगण्यात आले की, स्थानिक लोकप्रतिनिधी वारंवार खोटी आश्वासनं देत असून, पूल न उघडल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मनसेने अद्याप या आंदोलनात अधिकृत सहभागाची घोषणा केली नसली तरी, त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती डोंबिवलीमध्ये ‘मनोमिलनाची’ सुरुवात होईल, असे बोलले जात आहे. महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये? सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपकडून मुंबई, ठाणे आणि पुण्यात स्वबळावर लढण्याची रणनीती तयार केली जात आहे. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे “युती-अघाडीच्या चर्चांमध्ये वेळ न घालवता निवडणुकीच्या कामाला लागा” असे निर्देश दिले आहेत. “कोणासोबत युती करायची हे मी ठरवेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा संभाव्य राजकीय संवाद आणि डोंबिवलीतील आंदोलन यातून पुढील निवडणूक समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.