MNS News : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रायगडावर जाऊन आपल्या पक्षाचा 20 वा वर्धापन दिन साजरा केला. तसेच, वर्धापनदिनी आज मनसेची (MNS News) जोरदार नोंदणीही सुरू आहे. त्यातच रेणापूर पंचायत समितीत मनसे-भाजप युतीच्या माध्यमातून पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यात आली असून, सभापतीपद मनसेच्या वाट्याला आले आहे. मनसेच्या (MNS News) वर्धापन दिनी पंचायत समितीच्या सत्तेत सहभागी होत आपले राजकीय वजन सिद्ध केले आहे. लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. रेणापूर पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी काँग्रेसने ३, भाजपने ३ ,तर मनसेने २ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे, सत्तास्थापनेत मनसेची भूमिका निर्णायक ठरणार हे स्पष्ट झाले होते. MNS News पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये मनसेच्या मोनिका सूर्यवंशी यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपाचे शरद दरेकर यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. या ठिकाणी मनसेच्या विजयाचे शिल्पकार असलेले मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना भाजपसोबत आणण्यात त्यांना यश आले आहे. त्यानंतर, मनसे आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे.