विकासाच्या ओघात काश्मीरचे सौंदर्य हिरावू नये

पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होतेय चिंता
पुणे – “बर्फाळ पर्वतरांगा, खळाळत्या नद्या, विविध प्रकारच्या वनस्पतींनी, प्राणी-पक्ष्यांनी संपन्न अशी जैवविविधता काश्मीरचे हे नैसर्गिक सौंदर्य हीच त्याची खरी ओळख आहे. मात्र, विकासाच्या ओघात काश्मीरचे हे सौंदर्य हिरावले जाणार नाही, त्याची ओळख नष्ट होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळीच पर्यावरण संवर्धनाचे उपाय करणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले.
जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये कलम 370 आणि 35 अ रद्द करून, त्यांना केंद्रशासित राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आला. या निर्णयाची घोषणा होताच सोशल मीडियावर विनोदी मीम्सने धुमाकूळ घातला होता. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चा होती ती हे कलम रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विकासाला चालना मिळेल, तसेच त्याठिकाणी मालमत्ता खरेदीचे अधिकार मिळतील. यामुळे देशभरातील नागरिक, उद्योजक, व्यावसायिक आणि खुद्द काश्मिरी नागरिकही या निर्णयाचे स्वागत करत असले, तरी पर्यावरणप्रेमींकडून एक वेगळीच चिंता पर्यावरण अभ्यासक डॉ. अविनाश कांदेकर यांनी व्यक्त केली आहे.





