पिंपरी | मुद्द्यांची लढाई आली गुद्द्यावर !

लोणावळा, (वार्ताहर) – नगरपरिषदेचा कार्यभार हाती घेण्यासाठी आलेल्या मुख्याधिकारी अशोक साबळे यांना विरोध करीत लोणावळा जागरूक नागरिक मंचच्या वतीने सोमवारी मुख्याधिकारी दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तर आंदोलनादरम्यान नगरपरिषद कार्यालयात गेलेल्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्यात आणि आंदोलकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदा घेत आपापली बाजू मांडली.
जागरूक नागरिक मंचचे सोमवारी मुख्याधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी कार्यालयात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.
दरम्यान याचवेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेविका मंदा सोनवणे आणि आणि त्यांचे अन्य कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी म्हणून कार्यालयात आले आणि मुख्याधिकारी दालनासमोर असलेल्या नगरसेवक कक्षात बसले.
ठिय्या आंदोलनात बसलेले माजी उपनगराध्यक्ष भरत हरपुडे आणि दालनात बसलेल्या सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी यांच्यात हातवारे करण्यावरून आंदोलना दरम्यान जोरदार शाब्दिक चकमक झाली.
पोलिसांनी मध्यस्थी करीत प्रकरण तात्पुरते आटोक्यात आणले. मात्र एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांसोबत चर्चा करीत मुख्याधिकारी यांना दालनातून घेऊन जात दालन बंद केले, त्यानंतर आंदोलन स्थगित झाले.
मंचचे आंदोलन दिशाहीन – जाधव
झालेल्या वादाबद्दल सुरेखा जाधव यांनी माध्यमांकडे आपली बाजू मांडली. भरत हारपुडे यांनी पोलिसांसमोर वापरलेली शिवराळ भाषा व दिलेली धमकी याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आंदोलन सुरू असल्याने आम्ही बाजूला बसलो होतो.
पण असे असताना भरत हारपुडे यांनी हे नगरपालिकेत कसे आले, असे म्हणत आम्हाला उद्देशून शिवराळ भाषेचा वापर केला. खरंतर याठिकाणी सुरू असलेले आंदोलन हे दिशाहीन असून आंदोलन मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आले असल्याची टिका सुरेखा जाधव यांनी केली.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी लोणावळा जागरूक नागरिक मंचच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात वादग्रस्त टेंडर प्रकरणी नगरपरिषद आणि मुख्याधिकारी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या.
तसेच, भरत हारपुडे यांनीही आपली बाजू मांडली आहे. आम्ही आंदोलनाला बसलो असताना जाधव आणि पुजारी हे समोरून आम्हाला चिथावणीखोर हावभाव करीत असल्याने माझा संयम सुटला आणि श्रीधर पुजारी यांना अपशब्द बोललो.
पण सुरेखाताई जाधव यांना मी काहीही बोललो नाही. मी महिलांचा आदर करतो. लोकांची दिशाभूल करू नका, असे हारपुडे म्हणाले.
पैसे वाढले, मनुष्यबळ मात्र ‘जैसे थे’
पूर्वीचे जे मनुष्यबळ होते त्यांच्याकडून काम करून घेऊनच लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण, तसेच माझी वसुंधरा स्पर्धेत क्रमांक प्राप्त करीत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकली आहेत.
सध्याच्या ठेक्यातील वाढीव मनुष्यबळामुळे पूर्वीच्या ठेक्याची रक्कम ही जवळपास सात कोटी ने वाढलेली आहे. पण प्रत्यक्षात काम करणारे मनुष्यबळ हे पूर्वीसारखेच दिसत आहे.
जर पूर्वी एवढीच लोक किंवा त्यापेक्षा कमी लोक शहरात सध्या काम करत आहेत, तर मग ३४१ लोकांचा पगार लोणावळा नगरपरिषदेने ठेकेदाराला का द्यावा? असा प्रश्न लोणावळा जागरूक नागरिक मंचच्या वतीने उपस्थित करण्यात आला.




