Lonavala Municipal Council – लोणावळा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती, उपसभापती आणि सदस्यांची निवड शुक्रवारी (दि. २४) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सभेचे पिठासन अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी कामकाज पाहिले. सभेला नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.नगरपरिषदेच्या दैनंदिन कारभारात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध समित्यांच्या सभापतीपदी अनुभवी आणि जबाबदार नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्षपद नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्याकडे असून, नियोजन आणि विकास समितीचे पदसिद्ध सभापतीपद देविदास कडू यांच्याकडे देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सनी दळवी, स्वच्छता, वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापतीपदी धनंजय काळोखे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी दिपा अगरवाल, तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी जीवन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी स्वप्ना कदम यांची निवड करण्यात आली असून, भाग्यश्री जगताप यांची उपसभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बालविकासाशी संबंधित योजनांना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.नगरपरिषदेतील सर्वाधिक अधिकार असलेल्या स्थायी समितीच्या सदस्यांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे असतील, तर सदस्य म्हणून सनी घोणे, मुकेश परमार आणि दत्तात्रय येवले यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सर्व विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य म्हणून स्थायी समितीवर कार्यरत राहणार आहेत. स्थायी समिती ही आर्थिक तरतुदी, निविदा मंजुरी, विकासकामांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय नियंत्रण यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या समितीची रचना बिनविरोध आणि एकमताने झाल्याने नगरपरिषदेत सहकार्याचे वातावरण असल्याचे चित्र दिसून येते. मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत, नियमानुसार आणि कोणत्याही वादविवादांशिवाय पार पडली.